- महापालिकेने ठोठावला लाखांचा दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- गेल्या उन्हाळ्यात मोशी येथील कचरा डेपोस दोनदा मोठी आग लागली होती. त्या प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून संबंधित ठेकेदाराला ३ लाखांचा दंड करण्यात आला आहे. या पुढे आग लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोशी येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. शहरातील घरोघरचा कचरा संकलन करून मोशीत डम्पिंग केला जातो. कचरा डेपोतील सॅनिटरी लॅन्डफिलवर ६ एप्रिल २०२२ रोजी आग लागल्याची घटनी झाली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर १६ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आग लागली. ती आग अनेक तास धुमसत होती. त्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते. ती आग संबंधित ठेकेदाराने लावल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्या प्रकरणी तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी मोशीकचरा डेपोची पाहणी करून चौकशी समिती नेमली होती. तसेच संबंधित ठेकेदाराकडून आगीबाबत खुलासा मागविण्यात आला होता.
उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने कचऱ्याच्या ढिगाखाली मिथेल वायुची निर्मिती होते. हवेचा दाब निर्माण झाल्याने ज्वलनशील वायूचे उत्सर्जन होऊन आगीची घटना घडल्याचा अधिकऱ्यांनी खुलासा केला होता. ठेकेदाराचा खुलासा समाधानकारक नसल्याने तत्कालीन आयुक्त पाटील यांनी चौकशी समितीचा अहवाल सिंह यांच्यासमोर ठेवला होता. त्यानुसार ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, अहवालातील शिफारशीनुसार संबंधित ठेकेदाराला ३ लाखांचा दंड करण्यात आला. अग्निशामक दलाला जितका खर्च झाला तितका हा दंड आहे. पुन्हा आग लागू नये म्हणून दक्षता व खबरदारी घ्यावी. डेपोत अग्निशामक दलाचा बंब ठेवावा, असा आदेशही देण्यात आला आहे.












