- प्रशासकीय राजवटीत नागरिकांना ‘हकदार ही दारोदार’ या म्हणीचा येतोय प्रत्ययं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अनेक अधिकारी व विभागप्रमुख नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने संबंधित नागरिक थेट आयुक्तांना भेटतात. नागरिकांची भेट टाळण्याचे प्रकार घडू नये म्हणून सर्व अधिकारी व विभागप्रमुखांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांना भेटीसाठी राखीव वेळ ठेवावी, यासंदर्भात सूचना फलक लावावा, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
नागरिक, अधिकारी विभागप्रमुखांना भेटण्यासाठी पालिका भवनात येतात. मात्र, दौरा, बैठक, साइट विजिट, रजा आदी कारणांमुळे अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांबाबत नाराजी वाढत आहे. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आयुक्तांना भेटतात. परिणामी, आयुकांना भेटणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अशोभनीय असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
दुपारी ४ ते ५ या वेळेत अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटावे. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सर्व कार्यालयांनी त्यांच्या सूचना फलकावर ठळकपणे लावावा. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे व पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे. दौरा व भेटीसाठी आठवड्यातील ठराविक दिवस निश्चित करावा. कार्यालयीन वेळेत विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेनंतरच कार्यालय सोडावे, अशा सूचना दिल्या आहेत.
प्रशासकीय राजवटीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे विविध कामासाठी नागरिक येतात. आयुक्तांनी नागरिकांना भेटण्याची सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ ही वेळ निश्चित केली आहे. मात्र, या वेळेत आयुक्त बैठका, दौरा, कार्यक्रमात व्यस्त असतात. आयुक्त सिंह भेटत नसल्याने नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.












