न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट (बार्टी) चे उपकेंद्र पिंपरी चिंचवड शहरात आणण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २२ डिसेंबर १९७८ रोजी समता विचारपीठाची स्थापना करण्यात आली. संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑक्टोबर २००८ च्या शासन निणार्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यास स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश संशोधन व प्रशिक्षण आणि सामाजिक समता वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम, संमेलने, व्याख्याने, परिसंवाद, आयोजित करणे आणि सामाजिक समता या तत्वप्रणाली चा अभ्यास विविध ठिकाणी संस्थेचे उपकेंद्र सुरु करणे आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही नावीन्यपूर्ण व चांगल्या उपक्रमासाठी देशभर एक आदर्श महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बार्टीचे मुख्यसंचालक यांच्याशी पत्रव्यवहार करून पिंपरी चिंचवड शहरात बार्टीचे उपकेंद्र शहरात सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार करावा. बार्टीच्या वतीने अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. पिंपरी चिंचवड शहरात अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पुणे शहरात जावे लागते. बार्टी उपकेंद्राच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय व राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद, तसेच सर्व महामानवाचे जीवन चरित्र, समतावादी विचाराचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध होईल .
पिंपरी चिंचवड शहरात शिक्षणाबरोबरच संशोधन, प्रशिक्षण व सामाजिक तत्व प्रणालीचा विकास होणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर हे ज्ञानाचे केंद्र बनण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट (बार्टी) या संस्थेचे उपकेंद्र शहरात सुरु करणे गरजेचे आहे. जेणेकरून शहरातील विद्यार्थी, युवक, शासकीय कर्मचारी, लेखक व साहित्यिक यांना साहित्याचे एक नवीन दालन सुरु होईल, असे या निवेदनात रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.












