- मोफत प्रवेशासाठी ही आहेत महत्त्वाची कागदपत्रे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवारी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुषंगाने निवड यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रवेशासाठी निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना १२ एप्रिलला दुपारी ४ वाजतापासून मेसेज पाठविले जाणार आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शहरातील १७२ शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली.
ज्या पालकांच्या पाल्यांना लॉटरी लागली आहे. अशा पालकांना संदेश १२ एप्रिलपासून पाठवले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित शाळेत प्रवेश घेता येणार आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून पालकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या पात्र बालकांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. पात्र ठरलेल्या बालकांच्या पाल्यांना प्रवेशाबाबत संदेश प्राप्त होणार आहेत. मात्र, बालकांनी केवळ संदेशावर अवलंबून न राहता संकेतस्थळावर भेट देऊन निवड यादी पाहून प्रवेशाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक…..
मोफत प्रवेशासाठी अनेक महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रहिवासी पुरावा, जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, ओळखीचा पुरावा, बालक अनाथ असल्यास कागदपत्रे असे काही इतर कागदपत्रे प्रवेशावेळी आवश्यक आहेत.












