न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- हिंजवडी परिसरातील जांबे गावात संतापजनक प्रकार घडला असून, मातंग मजुराला मारहाण करीत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले आहे. या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून, अतिरिक्त पोलिस आयुक्त मुकुंद रानडे यांना आरोपींवर कडक करवाई करावी अशी मागणी सकल मातंग समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, हिंजवडी-जांबे येथिल विटभट्टीवरील मातंग समाजाचा मजूर त्याच्या कुटुंबासह जेवण करून, बसल्याचा राग मनात धरून, मजुराला बेदम मारहाण करत, मानवी विष्ठा खाण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना हिंजवडी जांबे गावात घडली आहे. आरोपी मालक संदीप पवार याच्याविरोधात पीडित २२ वर्षीय मजुराने फिर्याद दिली असून, हिंजवडी पोलिसात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, आरोपीला या प्रकरणात मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय मजूर हा आई, वडील, आजोबा आणि आजीसोबत हिंजवडी जवळील जांबे येथील आरोपी संदीप पवार याच्या विटभट्टीवर काम करतात. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मजूर आणि त्याचे कुटुंब हे जेवण करून बसले होते. काही वेळाने आरोपी मालक संदीप पवार आला आणि त्याने काम करायला सुरू करा असे सांगितले. यावर मजुराने आत्ताच जेवण केलं आहे थोडं बसतो असे सांगितले असता मालकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर मजुराने देखील शिवीगाळ केली.
वाद वाढत गेल्यानंतर आरोपी संदीप पवार याने त्याच्या पत्नीला घमेल्यात मानवी विष्ठा आणण्यास सांगितली. विष्ठा घेऊन आल्यानंतर मजुराला बेदम मारहाण करत विष्ठा खाण्यास संदीप पवार याने भाग पाडले. दरम्यान, या संतापजक घटने प्रकरणी पीडित मजुराने हिंजवडी पोलिसात धाव घेतली, पण महिला पोलिस काही केल्या तक्रार दाखल करुन घेत नव्हती. किरकोळ गुन्हा नोंदविला होता. मातंग समाज्यातील लहुजी शक्ती सेना, कार्यकर्ते, यांनी वरिष्ठांकडुन दबाव निर्माण केल्यावर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आरोपीला या प्रकरणात मदत करणाऱ्यांना सह आरोपी करून, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज पुणे शहर व सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल. या कामी उद्भभनाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील, असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी पुणे शहर मातंग समाजाचे संतोष जोगदंड, बापु वाघमारे, भगवान वैरागकर, पिंपरी-चिंचवड सकल मातंग समाजाचे तसेच अखंड बाराबलुतेदार समाज बांधवाचे नेते युवराज दाखले, संदिपान झोंबाडे, मनोज तोरडमल, नाना कसबे, किशोर जोगदंड, गणेश आहेर, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, असे प्रदेश अध्यक्ष शिवशाही व्यापारीसंघ तथा शहरप्रमुख लहुजी शक्तीसेना पिंपरी-चिंचवड शहरचे युवराज दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.











