न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. २० मार्च) :- अमोल कोल्हे यांच्यावर त्यांच्या विरोधकांतर्फे करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाचे आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत.
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, “आचारसंहितेच्या नवीन निमयावलीनुसार एखादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची एखादी मालिका खासगी वाहिनीवर सुरू असेल तर ती थांबवता येणार नाही. मात्र, दूरदर्शन सारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका दाखवता येणार नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची मालिका आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार थांबवता येणार नाही. मंगळवारी मेल व सी व्हिजील अॅपवर प्राप्त झालेली कोल्हे यांची तक्रार निकाली काढण्यात आली आहे.”
तत्पूर्वी, अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी नावाच्या मालिकेला दूरचित्रवाणीवर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने तसेच अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असल्याने विरोधकांनी त्यांच्या या मालिकेमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार दाखल केली होती.











