न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च) :- वायसीएम रुग्णालयामध्ये चक्क दारू पिऊन केस पेपर काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लोकप्रतिनिधीला अरेरावीची भाषा वापरत हैदोस घातला होता. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्र दिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात १० मार्च रोजी नातेवाईकाचा स्मशान दाखला घेण्याकरीता गेलो होतो. त्यावेळी कर्तव्यावर असणारे विनोद शिंदे हे मद्यपान करुन कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच त्यांनी माझ्याशी उद्धट भाषा वापरुन गैरवर्तन केले. याबाबत माहिती घेतली असता महापालिकेच्या विविध विभागामध्ये अनेक कर्मचारी मद्यपान करुन कर्तव्यावर येत आहेत.
त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊन नागरीकांचीही गैरसोय होत आहे. महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यासाठी भरारी पथकांमार्फत अथवा तपासणी पथकामार्फत अचानक भेटी देऊन कर्मचा-यांची तपासणी करण्यात यावी. यामध्ये जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे या पत्रात साने यांनी म्हटले आहे.











