न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- भाजपाचे जेष्ठ नेते व पवार कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे आझमभाई पानसरे यांचे चिरंजीव निहाल यांनी गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरीत झालेल्या युवक मेळाव्यात निहाल यांना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले. निहाल हे उच्चशिक्षित असून, वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, मंगलदास बांदल, माजी नगरसेवक वसंतराव लोंढे, जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे आदींसह हजारो युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी आणि आठ दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांनी आझम पानसरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी पानसरे यांचे हजारो समर्थक उपस्थित होते. आझम पानसरे यांनी २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर मावळ लोकसभा निवडणुक लढवली होती. आझम पानसरे पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी व अल्पसंख्याक समाजाचे ताकतवान नेते आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेच्या युतीच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.











