न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- रस्ता आणि पदपथांवर वारंवार अतिक्रमण होत असल्याने वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाई केली. गुरुवारी (दि. ११) सकाळी हिंजवडी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेत वाकड रस्त्यावरील पदपथ मोकळे केले. सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. वाहतूक पोलिसांनी आक्रमक होत अचानक कारवाई सुरू केल्याने व्यावसायिकांची सुद्धा धावपळ उडाली. काहींनी पदपथावर ठेवलेले साहित्य स्वतः काढून घेत सहकार्य केले. तर, काही अतिक्रमणे पोलिसांनी वॉर्डनच्या मदतीने स्वतः काढली.
दरम्यान, वाकड, हिंजवडी रस्ता आयटीपार्कला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे शहर आणि उपनगरातून विविध कारणास्तव लाखो नागरिक याच रस्त्याने आयटीनगरी परिसरात येत असतात. त्यामुळे दिवसरात्र वाहतूक कोंडीने वाकड रस्ता गजबजलेला असतो.
पदपथावरील विविध अतिक्रमणे हटवून पोलिसांनी संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली. मुख्य रस्त्यावरील पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाकड नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ व्यावसायिकांनी अनेक दिवसांपासून प्रमाणावर अतिक्रमण केले होते. यामध्ये प्रामुख्याने फळ, भाजी विक्रेते नीरा, ज्यूस, सेक्स सेंटर, टपरी, पंक्चरवाले यांचे प्रमाण अधिक होते. तर, अनेक मोठे व्यावसायिक लोखंडी फलक आणि विक्रीचे साहित्य पदपथावर ठेवत होते.
मुख्य रस्त्याच्या कडेला आणि पदपथावर ठिकठिकाणी अतिक्रमणे झाल्याने पादचा-यांना चालणेसुद्धा कठीण बनले होते. वाहतूक कोंडीतसुद्धा नाहक भर पडत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. अखेर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत सर्व अतिक्रमण हटवून कायदेशीर कारवाई केली.
आवाहन वारंवार करूनसुद्धा पदपथावर अतिक्रमण होत होते. त्यामुळे विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे काढण्यात आली. व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे कोणी अतिक्रमण केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे.
– विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, हिंजवडी…















