- कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था; दोनशे कोटींचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. त्यासाठी शहरातील विविध भागांत १० अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यात पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या जागेत अत्याधुनिक असे मध्यवर्ती अग्निशामक दल असणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी मंगळवारी सांगितले.
शहराची लोकसंख्या ३० लाखांच्यापुढे गेली आहे. शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार शहरामध्ये किमान १८ अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरामध्ये केवळ ८ केंद्र आहेत. त्यामध्ये देखील मोशी येथील उपकेंद्र उद्घाटनाअभावी अद्याप सुरू झाले नाही. संत तुकारामनगर येथे अग्निशमक केंद्राचे मुख्यालय आहे. मात्र, त्याची जागा अपुरी असल्याने तिथे इतर सोयीसुविधा नाहीत. त्यासाठी पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या साडेचार एकर परिसरामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे मुख्य अग्निशमक केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ३५० कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवास व्यवस्था असणार आहे. त्यामुळे मुख्य अधिकारी, अधिकारी व कर्मचारी हे दुर्घटना घडल्यास कधीही तात्काळ उपस्थित होतील. तसेच केंद्रामध्ये मॉकड्रील व परेड करण्याची सुविधा व मैदान असणार आहे. कर्मचाऱ्यांना पोहण्यासाठी जलतरण तलाव, व्यायामशाळा, वाहन कार्यशाळा व कार्यालय आदी सुविधाही असणार आहे. या इमारतीसाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या मध्यवर्ती केंद्रासह पुनावळे, च-होली, एमआयडीसी भोसरी, दिघी या चार ठिकाणी अग्निशमन उपकेंद्र उभारण्याची करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आवश्यकतेनुसार अद्ययावत वाहने व यंत्रसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. अग्रिशामक दलासाठी आवश्यक संख्येने कर्मचारी भरती प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे पालिकेचे अग्निशामक दल अधिक सशक्त होणार आहे, असा दावा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केला आहे.