न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ पुणे जिल्ह्यातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे रॅण्डमायझेशन करण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक २५ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजल्यापासून भोसरी येथील वखार महामंडळाचे गोडावून येथे रॅण्डमायझेशनची प्रक्रिया पार पडणार आहे.
यावेळी इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.
रॅण्डमायझेशन म्हणजे काय?
रॅण्डमायझेशन म्हणजे यादृच्छिकीकरण. कोणत्याही विधानसभा आणि नंतर कुठल्याही मतदान केंद्राला वितरित करतेवेळी ईव्हीएमची दोन वेळा यादृच्छिक (रँडम) चाचणी केली जाते, ज्यामुळे कुठल्याही निर्धारित वाटपाची शक्यता राहत नाही. मतदान सुरु होण्यापूर्वी, मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या मतदान एजंटांसमक्ष मतदान केंद्रांवर कृत्रिम मतदानाचे आयोजन केले जाते. मतदानानंतर ईव्हीएम सील केले जाते आणि मतदान एजंट सीलवर स्वाक्षरी करतात. मतदान एजंट ईव्हीएमच्या प्रवासादरम्यान स्ट्रॉंग रूम पर्यंत जाऊ शकतात.











