न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे आज शनिवार (दि. २३) रोजी पुणे-आळंदी मार्गावरून प्रचारासाठी जात असताना काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅलीत सहभागी झाल्याचे दिसले.
रॅली दिसताच अमोल कोल्हे वेळ न दवडता त्यात सहभागी झाले. स्वतः च्या हातात शिवज्योत घेऊन कोल्हे हे अनवाणी पायाने धावले. आज तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. अमोल कोल्हे हे रॅलीत सहभागी होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या.
सकाळी पुणे- आळंदी मार्गावरून जात असताना शिवप्रेमी तरुणांनी काढलेली शिवज्योत रॅली दिसली आणि माझे पाय आपोआप रॅलीकडे वळाले. थोड्या अंतरासाठी मीही रॅलीमध्ये सहभागी झालो, काही पावले महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत धावल्याचे समाधान मिळाले. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो, असे डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवज्योत रॅलीत सहभागी झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.











