न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाऱ्या भूमकर चौक, विनोदे चौक व लक्ष्मी चौकातील मार्गावर करण्यात आलेली एकेरी वाहतूक चुकीच्या पद्धतीची असून ती जनतेला अमान्य असल्याचा आरोप रहिवासी व व्यापाऱ्यांनी पोलिस, राजकीय पदाधिकारी व मंत्र्यांकडे पत्राद्वारे केला आहे.
व्यापारी व रहिवाशांनी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह राज्याचे गृहमंत्री, सर्व स्थानिक आमदार, खासदार स्थानिक नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मांडली आहे. आठ दिवसांच्या आत काय तो निर्णय द्यावा, अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आम्हा जनतेला वेठीस धरून आपण काय साध्य करू इच्छिता, हे कोणालाही ज्ञात होत नाही. एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय बेकायदा आहे. तो आम्हाला मान्य नाही. माणुसकीचा विचार करून कृपया आम्हा जनतेवर निर्णय लादू नये व ताबडतोब ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी ही विनंती असे पत्रात म्हटले आहे.












