न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान येलवाडी येथील शेतकरी सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या-खासदार आणि पिंपळे सौदागरमधील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा-सोन्या या बैलजोडीस मिळाला आहे.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, अजित मोरे, भानुदास महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालखी रथास बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील विविध भागातील इच्छुक शेतकरी संस्थानकडे अर्ज करतात. संस्थानकडे १८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन, संस्थानचे विश्वस्त मंडळ, पालखी सोहळा प्रमुख यांनी बैलजोडीची पाहणी केली. बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुण पाहिले. त्यानुसार १८ पैकी दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडी निवडण्यात आल्या. संस्थानने देऊळवाड्यात बुधवारी (ता. ३१) अंतिम दोन बैलजोडीची निवड जाहीर केली. यात मोरे आणि झिंजुर्डे यांच्या बैलजोडीस मान मिळाला. तसेच चौघडा गाडीसाठी चिंबळी येथील शेतकरी सत्यवान ज्ञानेश्वर जैद यांच्या बैलजोडीस संस्थानने मान दिला आहे.