न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- पर्यावरणपूरक जीवनमान व्यतीत करून वसुंधरा संवर्धनाचा जागर करण्यासाठी ‘रिसायकल-रियुज-रिड्युस’ अर्थात ‘पुनर्निर्मिती-पुनर्वापर- वस्तूंचा मर्यादित वापर’ हा उपक्रम आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात राबविण्यात आला. या उपक्रमास महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या माध्यमातून घरातील जुने कपडे, खेळणी, भांडी, बूट, चप्पल, पर्स, बॅग्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके आदी निरुपयोगी वस्तू जमा करण्यात आल्या.‘रिसायकल-रियुज-रिड्युस’ उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचा-यांना परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने कृतीशील सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘रिसायकल-रियुज-रिड्युस’ उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे.
महापालिका मुख्यालयामध्ये या उपक्रमाची सुरुवात मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, उज्ज्वला गोडसे तसेच विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
महानगरपालिकेच्या वतीने ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियान अंतर्गत ‘रिसायकल-रियुज-रिड्युस’ कलेक्टीव्ह ड्राईव्ह या उपक्रमाचे आयोजन
करण्यात आले. या उपक्रमाची सुरवात दि. २० मे २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. या अंतर्गत महापालिकेच्या तळमजल्यावर संकलनासाठी वेगवेगळ्या निरूपयोगी वस्तुंनूसार स्वतंत्र पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घरातील जुने कपडे, खेळणी, भांडी, बूट, चप्पल, पर्स, बॅग्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके इत्यादी निरूपयोगी वस्तू जमा करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत ‘रिसायकल-रियुज-रिड्युस’ अर्थात ‘पुनर्निर्मिती-पुनर्वापर-वस्तूंचा
मर्यादित वापर’ या संकल्पनेवर ३ आर तत्वांचा प्रचार करण्यात आला. ज्या निरूपयोगी वस्तू जमा केल्या आहेत त्यातील पुनर्वापराच्या वस्तू तसेच दुरूस्त
करण्याच्या वस्तू दुरूस्तीनंतर गरजूंना देण्यात येणार आहेत. तर टाकाऊ वस्तूंची विहित केलेल्या वर्गवारीनुसार विल्हेवाट लावण्यात येईल. वस्तूंना ‘रिसायकल-रियुज- रिड्युस’ करण्यासाठी म्हणजेच आपल्याकडील वस्तूंच्या पुन:वापरासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असून प्रत्येक घर आणि कार्यालयामध्ये पर्यावरणाबद्दल जागृती आणि उत्तरदायित्व निर्माण होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी अशा कल्याणकारी उपक्रमात आवर्जून सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.












