- आमदार महेश लांडगे यांचीही आता लोकसभेच्या रणांगणात उडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- भाजप-शिवसेना महायुतीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा जर भाजपच्या वाट्याला आली आणि पक्षाने जबाबदारी दिली, तर आपण निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि. ७) पत्रकारांशी बोलताना केले.
केंद्रातील भाजपप्रणित सरकारला नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. मावळ आणि शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, शिरूर लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे. तुम्ही शिरूर लोकसभा लढणार का? या प्रश्नाच्या उत्तरात आमदार लांडगे म्हणाले, ‘पक्षाने एखादी जबाबदारी दिली तर ती तेवढ्याच क्षमतेने पेलण्याची आपली तयारी असते. महायुतीच्या जागा वाटपात जर शिरूरची जागा भाजपच्या वाट्याला आली आणि पक्षाने जबाबदारी दिली, तर ही जागा मी लढवेल.
पिंपरी-चिंचवड शहराचे नाव बदलण्याची सध्या होत असलेली मागणी लक्षात घेता माझे वैयक्तिक मत हे शहराचे नाव बदलण्याच्या बाजूने आहे. मी देखील याबाबत मागणी केली होती. मात्र, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. शहरातील शास्ती कराचा प्रश्न सोडविण्याबरोबरच नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न सोडविण्यावर आपण भर दिला असल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले.












