- लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे ठेवावी जवळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२, जाधववाडी येथील घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात मंगळवारी पहिल्याच दिवशी २३४ लाभार्थ्यांना चावी प्रदान करून सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला. आमच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले, अशी भावना व्यक्त करत लाभार्थ्यांनी ताबा घेतला.
पेठ क्रमांक १२ गृहप्रकल्पात ईडब्ल्यूएस आणि एलआयजी गटासाठी सोडत काढण्यात आली. त्याचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. काही तांत्रिक अडचणींमुळे ताबा देण्यास विलंब होत असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मंगळवारपासून सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरुवात झाली. इमारतनिहाय ताबा प्रक्रियेचा कार्यक्रम १९ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती पीएमआरडीएतर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
पीएमआरडीएतर्फे ईडब्ल्यूएस सदनिकांसाठी आठ पथके आणि एलआयजी सदनिकांसाठी दोन पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी असून, सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत पहिला ते सहाव्या मजल्यावरील आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत सातव्या ते अकराव्या मजल्यावरील सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. ताबा घेताना लाभार्थ्यांनी सदनिकेचे अंतिम वाटपपत्र व आधार कार्डची मूळ प्रत इत्यादी कागदपत्रे सोबत घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदनिकेच्या मूळ अर्जदारास ताबा देण्यात येणार आहे
लाभार्थी हे सदनिकेचा ताबा घेण्यास हजर न राहिल्यास अशा लाभार्थ्यांना १९ जूननंतर ताबा देण्यात येणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी ईडब्ल्यूएस गटातील १८२ आणि एलआयजी गटातील ५२ अशा एकूण २३४ सदनिकांचे ताबे देण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
– बन्सी गवळी, सहआयुक्त, जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए…












