न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च) :- तळवडे येथील पुणे कार्बन इंडिया आणि जपानस्थित औपॅक जपान यांनी चाकण येथे संयुक्तरित्या उभारण्यात आलेल्या पुणे औपॅक प्रा. लि. कंपनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्बनतज्ञ डॉ. आर. जी. शहा, डॉ. किशोर अफजलपुरकर, पुणे औपॅकचे चेअरमन सुरिंदरपालसिंग गुलाटी, व्यवस्थापकीय संचालक विकी गुलाटी, औपॅक जपानचे चेअरमन युझुरू योशिंदासान, व्यवस्थापकिय संचालक किमिओ सकाईसान आदी उपस्थित होते.
पुणे औपॅकचे चेअरमन गुलाटी म्हणाले की, परकीय गुंतवणुक भारतात यावी, येथील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही जपानच्या औपॅक कंपनी सोबत सामंजस्य करार केला. पुणे कार्बन ही एकमेव भारतीय कार्बन उत्पादन करणारी कंपनी आहे, जी जपानच्या कंपनीसोबत संयुक्त उत्पादन करीत आहे. या औपॅक कंपनीने निर्मितीसाठी सुमारे ५० कोटी गुंतवणूक केलेली आहे. लवकरच ५० कोटी गुंतवणूक केली जाणार आहे. चाकण परिसरातील २०० कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.
विकी गुलाटी म्हणाले की, मंदीच्या काळात देखील आम्ही कंपनी उभारण्याचे धाडस करून, ६० हजार स्क्वेअर फूट जागेत बांधकाम केले. या कंपनीत मायक्रो आणि वाहनांना लागणारे कार्बन ब्रश बनविले जाते. भविष्यात ३५% जागतिक बाजारपेठ काबीज करण्याचे आमचे ध्येय आहे.















