न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च) :- अपना वतन संघटनेने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ”देशभरात सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवाला सुरवात झाली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान “विकास” हा शब्दच गायब झाल्याचे दिसत आहे. महारष्ट्रामध्ये तर नेते एकमेकांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. यामध्ये भाजपचे अनेक वाचाळवीर आहेत. त्यातील एक वाचाळवीर म्हणजे जालन्यातील ” भाजपचा बेताल चौकीदार” रावसाहेब दानवे आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बीकट झाली आहे. तर सततच्या नापिकीमुळे शेतकरी राजा हवाल दिल झाला आहे. शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. राज्य व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला नुसती पाने पुसण्याचे काम होत आहे. शेतकऱ्यांच्या विकासाकरिता सरकार कडून कोणत्याही ठोस उपाय योजना राबवल्या जात नाहीत. शेतीमालाला चांगला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचा मार्ग स्विकारत आहेत. महाराष्ट्रात अच्छे दिनाचे स्वप्न दाखवुन सरकार सत्तेवर आले. परंतू, भाजप सरकारलाही शेतकरी आत्महत्या रोखण्यात यश आले नाही. महाराष्ट्रात २०१४ पासून ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यत सर्वाधिक १३०१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (सदर आकडेवारी महसुल व वनविभाग मंञालय मुंबई यांच्याकडून मागवली आहे)
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत असताना हा ” बेताल चौकीदार” शेतकऱ्यांबाबत अतिशय अपमानास्पद बरळत असतो. तूर खरेदीवर बोलताना शेतकऱ्यांना उद्देशून “रडतात साले” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. परंतु, भाजपच्या कुठल्याही चौकीदाराने याबाबत या बेताल चौकीदाराला जाब विचारला नाही. शेतकऱ्यांच्या तूर, कापूस, ऊस, बाजरी सारख्या पिकांबाबत अजिबात बोलायचे नाही “रडीचे धंदे बंद करा” असे विधानही केले.
शेतकरी कर्जमाफीच्या बाबत बोलताना या चौकीदाराने तर हद्दच पार केली. कर्ज माफ करून, शेतकरी आत्महत्या कमी होणार आहेत का? तसे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन कर्ज माफ केल्यावर आत्महत्या होणार नाही, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असे नशेत असल्यासारखे वक्तव्य केले. अशा शेतकरी विरोधी चौकीदाराला त्याची लायकी दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
काल परवाच्या सभेत बोलताना या दानवे नामक पाकिस्तानप्रेमी चौकीदाराने पुलावमतील शहिदांना “अतिरेकी” म्हंटले आहे. भारताचं खाऊन पाकिस्तानच गुणगान करणाऱ्या चौकीदाराला मतदान स्वरूपी यंत्रणेच्या माध्यमातून घरी बसवा तरच यांच्यासारखे वाचाळवीर सुधारतील. अशा नेत्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. कारण एकावेळी बोलताना हा बेताल चौकीदार बरळला होता “निवडणुकीच्या वेळी लक्ष्मी घरी येत असते ती स्वीकारा, परत जाऊ देऊ नका. त्याने यावेळी लोकशाही यंत्रणेचा अवमानच केला होता. एवढं सगळं करूनही पारदर्शक व सुसंस्कृत म्हणवणारा भाजप सारखा पक्ष या “बेताल चौकीदारच्या” बाजूने उभा आहे यातूनच पक्षाची नीतिमत्ता लक्षात येते. बर्फामध्ये उभे राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना अतिरेकी संबोधणाऱ्या व देशातील जनतेचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला ” साले “म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे या “बेताल चौकीदारास ” या लोकसभेच्या निवडणुकीत घरी बसवून आपली ताकद दाखून द्या”, असे या पत्रात अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी म्हटले आहे.















