न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ मार्च) :- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी भोसरी एमआयडीसी परिसरातील असुविधांबाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यापूर्वी आयुक्तांच्या दालनात भोसरी परिसरातील उद्योजकांची बैठक पार पडली होती. त्यावेळी एमआयडीसीतील असुविधांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. तसेच भोसरी एमआयडीसी परिसरातील नाले, गटारे पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावेत, अशी मागणीही फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आयुक्तांकडे केली होती.
परंतु, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. एमआयडीसी परिसरात अनेक नाले व गटारांमध्ये गवत, कचरा, मातीचा ढीग साचला आहे. परिणामी पावसाळ्यात नाले तुंबून कंपन्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी येते. काही कंपन्या या रस्त्याला समांतर असल्याने मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान होते. तसेच परिसरात अनेक अनधिकृत टपऱ्या झाल्याने त्यांचे सांडपाणीदेखील रस्त्यावर येत असते.
तसेच एमआयडीसीतील औद्योगिक परिसरात चार ते पाच हजार इंडस्ट्रीज आहेत. यामध्ये मुख्यतः केमिकल इंडस्ट्रीज, फार्मासिटिकल, कलर इंडस्ट्रीज, प्लेटिंग इंडस्ट्रीज अशा रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. उत्पादनावर प्रक्रिया केलेले त्यांचं दूषित व केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर येत असते. रस्त्यावर मुकी व मोकाट जनावरे फिरत असतात. ते दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना बाधा पोहचु शकते. तसेच येता-जाता रस्त्यावर गाड्या जात असतात त्याचे पाणी येणाऱ्या कामगार वर्गावर मोठ्या प्रमाणात उडत असते.
बऱ्याच ठिकाणी एमएसईबीचे हाय व्होल्टेज कनेक्शन आहे. त्यामुळे निश्चित जीवितहानी होण्याचा मोठा धोका संभवतो. तसेच प्रतिवर्षी पावसाळ्यात ऑइल मिश्रीत पाण्यामुळे अपघातही होतच असतात. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष पुरवावे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.











