- पिंपरी चिंचवड शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी गाठले कृष्णकुंज
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च ) :- सध्या पिंपरी चिंचवड शहर व राज्यभरात लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. भलेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेसाठी उमेदवार दिलेला नसला, तरी आगामी लोकसभेच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याइतपत मनसेची कामगिरी दखलपात्र आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शहर मनसेचे पदाधिकारी यांनी शहरातील विविध विषयांबाबत आज बुधवार ( दि.२७ ) रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंजवर भेट घेतली.
यावेळी किशोर शिंदे (पिं. चि. प्रभारी), सचिन चिखले (शहर अध्यक्ष, पिं. चिं. नगरसेवक), उप-शहरअध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, नाशिर शेख, शहर सचिव – रूपेश पटेकर, विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, महिला सचिव सीमा बेलापुरकर आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. शहरातील मावळ व शिरूर लोकसभा निवडणुकांचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. तसेच शहरातील विविध समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी येत्या (दि. ६ एप्रिल) रोजी मनसेच्या वतीने आयोजित गुढीपाडवा मेळावा तसेच मावळ व शिरुर लोकसभा निवडणूकांबाबत ध्येय, धोरणांचा त्यांनी उहापोह केला.
मागील २०१४ च्या निवडणूकीत मनसेच्या उमेदवारांचा पराभव झालेला असला, तरी त्यांनी मताधिक्य मिळविले होते. त्या निवडणुकीत त्यांना तब्बल ८० हजार मतदान मिळाले होते. मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघात आता मनसेची ताकद वाढलेली आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेबांच्या प्रभावामुळे मनसेच्या हक्काचे मतदान वाढलेले आहे. येत्या (दि. ६ एप्रिल) रोजी मनसेच्या वतीने आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राजसाहेब ठरवतील, त्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी मनसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या गुढीपाडवा मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.















