- तब्बल २७ वर्षांनी पुण्यात विश्वचषक सामन्यांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) : ICC Men’s World Cup 2023 एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या स्पर्धेत पुणे शहराला पाच सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. तब्बल २७ वर्षांनी पुण्यात विश्वचषक सामन्याचे आयोजन होणार आहे. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर होणार आहेत.
मुंबईत एका खास सोहळ्यात दुपारी १२ वाजता विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अहमदाबाद, दिल्ली, मंबई, कोलकता या प्रमुख क्रिकेट शहरांच्या बरोबरीने पुण्याला विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात यापूर्वीही झाले असले, तरी एकाच वेळेस इतक्या सामन्यांचे यजमानपद पुणे शहराला प्रथमच मिळाले आहे. यापूर्वी, १९९६ मध्ये पुण्यात विश्वचषक स्पर्धेचा अखेरचा सामना खेळविण्यात आला होता.
पुण्यातील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी भारत वि. बांगलादेश असा होईल. त्यानंतर पात्रता फेरीतील दुसरा संघ वि. अफगाणिस्तान (३० ऑक्टोबर), न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका (१ नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (१२ नोव्हेंबर) असे पुण्यातील अन्य सामने होणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामन्याने साखळी फेरीची सांगता होणार आहे.












