न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- महापालिकेच्या विविध विभागातील ब आणि क गटातील जागांसाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल १० जुलै दरम्यान लागणार आहे. तसेच महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये यूपीएससीची परीक्षा आली होती. त्यामुळे ८९ जणांची परीक्षा घेणे शक्य झाले नाही. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा १७ जुलैला घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.
महापालिकेच्या ३८७ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ या तारखेला परीक्षा झाली. या परीक्षेसाठी ८५ हजार ३८७ जणांनी अर्ज केले होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरसूची दोन दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या लॉगीन आयडीवरून पाहता येणार आहेत. त्यावर हरकती असल्यास त्या तीन दिवसांत कळविण्याची मुदत दिली आहे.
त्या ८९ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा. अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, त्यांची परीक्षा घेण्यास उशीर होत आहे. त्यात लिपिक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे.













