न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ मार्च) :- शिरूर लोकसभेची उमेदवारी खासदार आढळराव पाटील यांना जाहीर झालेली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.
खासदार आढळराव यांच्या उमेद्वारीची घोषणा होताच आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी भोसरी येथे बैठक घेतली व विरोधी भूमिका घेत आढळरावांचा प्रचार करण्यास विरोध दर्शविला होता. भोसरीतील प्रत्येक प्रकल्पास खासदार आढळराव यांनी विरोध केला होता. खोटेनाटे आरोप केले होते. आता त्यांचा प्रचार कसा करायचा? लोकांसमोर त्यांच्यासाठी मतं मागायला गेल्यावर लोक प्रश्न विचारतील? आढळराव यांनी अगोदर केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत. त्यानंतरच काय ते पाहू, अशी एकसुरी मागणी आमदार लांडगे समर्थकांनी यावेळी केली होती.
एक पाउल मागे घेत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांची आज शुक्रवार (दि. २९) रोजी भेट घेतली. यावेळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शिरुरचे उमेदवार व विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे, दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आदी बैठकीस उपस्थित होते.
भोसरीतील विकासकामाबाबत आजवर केलेले आरोप आणि दिलेली पत्रे मागे घेत व भोसरी विधानसभेची जागा भाजपला सोडण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळासह दोन दिवसात भेट या मुद्द्यांवर आढळराव यांनी आमदार लांडगे यांना आश्वासन दिले आहे. या दोन मुद्द्यावर तह पूर्ण झाला असून, आमदार महेश लांडगे यांनी आजपासूनच युतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.










