- शहर मनसे आयोजित गुढीपाडवा मेळावा बैठक संपन्न – सचिन चिखले
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शहर मनसेचे पदाधिकारी यांनी शहरातील विविध विषयांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंजवर नुकतीच भेट घेतली होती.
त्याप्रसंगी अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना येत्या (दि. ६ एप्रिल) रोजी मनसेच्या वतीने आयोजित गुढीपाडवा मेळावा तसेच मावळ व शिरुर लोकसभा निवडणूकीत पक्षाचे ध्येय, धोरण याबाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने पिपरीं चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिकांची बैठक नुकतीच पिंपरी येथे पार पडली.
यावेळी मनसे उपाध्यक्ष रणजित शिरोळे, किशोर शिंदे (पिं. चि. प्रभारी), मनसे नेते बाबू उर्फ राजेंद्र वागस्कर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना या सर्व विगचे शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष व मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मनसैनिकांना मार्गदर्शन करताना मनसे उपाध्यक्ष रणजित शिरोळे म्हणाले की, ”गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची पुढील दिशा काय असेल? याबाबत मेळाव्यात सांगतीलच परंतु, दुष्मन का दुष्मन अपना दोस्त या उक्तीप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. भाजप, मोदी व शहा हे आपले खरे विरोधक आहेत. इतर पक्ष आमिष दाखवतील आपण त्याला बळी पडू नये”.
ज्यांना-ज्यांना राजसाहेबांचे विचार पटतात, अशा सर्वाना मेळाव्याला घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच शहर मनसेने आयोजित केलेल्या मनसे आपल्या दारी या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मनसे नेते बाबू उर्फ राजेंद्र वागस्कर म्हणाले की, ”मनसे आपल्या दारी” हा उपक्रम पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी ठरला आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी राज साहेबांना त्याची संकल्पना पटवून देणार आहे. संघटन बांधणी यशस्वी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राज साहेबांची भाषणे लोकांपर्यंत पोहचवा, म्हणजे सत्य लोकांसमोर येईल. तसेच राजकारण हे वेळ व काळ पाहून करावे लागणारे काम आहे. ज्याप्रमेण सन १९८० मध्ये बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना खुला पाठिंबा दिला होता, त्याप्रमाणेच आता त्याची री ओढण्याची वेळ आली, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले की, पक्षबांधणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून, येणाऱ्या काही दिवसात मनसेचे शहरातील चित्र बदललेले असेल. तसेच राज साहेबांना आपण सर्वांनी मिळून ताकत द्यावी, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांसमोर केले.
राजसाहेब जे काही करतील ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच असणार, असा विशास मनविसे अध्यक्ष हेमंत डांगे यावेळी व्यक्त केला व मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.










