न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- देहूगाव नगरपंचायतीत ठेकेदारी पद्धतीवर काम करणारे एकूण २५ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांचा पगार थकविला असून, त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबीयांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
देहूगाव नगर पंचायतीमधील पाणी पुरवठा, आरोग्य, बांधकाम, कर संकलन अशा विभागात सुमारे २५ कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यामुळे कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. या कामगारांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्याकडे पगाराविषयी विचारणा केली असता, त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
विविध विभागात काम करणाऱ्या २५ कामगारांच्या मे आणि जून या दोन महिन्याच्या पगाराची एकूण रक्कम ५ लाख ६२ हजार ४५० रुपये इतकी थकीत आहे. दोन दोन महिन्यांचे पगार न मिळाल्याने हे कामगार हवालदिल झाले आहेत.
कामगारांचे पगार दोन महिने झालेले नाहीत. काही तांत्रिक अडचणीमुळे असा प्रश्न निर्माण झाला होता. आता आम्ही प्रत्येक ठेकेदारांच्या बिलांचे धनादेश काढले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या कामगारांचे पगार होतील.
– संघपाल गायकवाड, देहूनगर पंचायत अभियंता..












