न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च) :- राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाच्या दिवशी त्या-त्या मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदारसंघात ११, १८, २३ व २९ एप्रिल असे चार टप्प्यात मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ज्या तारखेला ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाने राजपत्र असाधारण भाग १-मध्य उप-विभाग, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना जाहीर केली आहे. यात म्हटले आहे की, क्रमांक सर्विसु . १०१९ / प्र . क्र . ४४ / २९ . – परक्राम्य संलेख अधिनियम , १८८१ ( १८८१ चा २६ ) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९ / १ / ६८ – नेयुडीएल – तीन , दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणक – २०१९ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी संबधित लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ व शिरूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केल्यामुळे आता मतदान करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे व बारामती मतदार संघात मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी व सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी मावळ व शिरूर मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील. ही अधिसूचना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सं. कृ. भोसले, शासनाचे उप सचिव यांच्या सहीने जाहीर झाली आहे.










