न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- दुकानात काम करीत असताना पाचजण कपडे खरेदी करण्याकरीता दुकानात आले. दुकानातील कामगार मुलाने त्या मुलांना पायातील चप्पल चिखलाने भरलेली असल्याने दुकानाच्या बाहेर काढा, असे सांगीतले. तेव्हा त्याच्यामध्ये वाद झाला. फिर्यादी यांनी वाद मिटवला. अचानकपणे दोन मुले दुकानाच्या बाहेर गेली व आरडा ओरडा करून मोठमोठे दगड दुकानाला लावलेल्या काचेवर मारुन दुकानाच्या काचा फोडून टाकल्या. त्यातील एक दगड फिर्यादी यांच्या डोक्याला लागुन जखम झाली.
त्यातील एका अनोळखी मुलाने कमरेला लपवलेला कोयता काढला व फिर्यादीच्या दुकानातील कामगाराच्या डोक्यावर मारला परंतु, त्याने कोयता हाताने अडविला त्यामुळे त्याच्या उजव्या हाताची करंगळी व शेजारील बोटावर वार बसला. तो जखम झाली. त्यांनी दुकानातील सामान अस्थाव्यस्त फेकले व आरडाओरडा करत दुकानाच्या बाहेर जावून कोयता हवेमध्ये फिरवत ‘आम्ही इथले भाई आहोत. कोण आमच्या नादाला लागतोय तेच पहातो’ असे म्हणत रुपीनगर मेन रोडवरुन मिनारा मश्चिद व पुढे हनुमान सोसायटीच्या बाजुने कोयता हवेमध्ये फिरवत दहशत करत पळत गेले. तेव्हा आजुबाजूच्या दुकानदारांनी त्यांची दुकाने भीतीने बंद केली. त्यांनी जाताना हातातील कोयत्याने रस्त्यावरील चारचाकी व दुचाकी वाहनांच्या कोयत्याने काचा फोडल्या. हा प्रकार (दि. ८) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास रुपीनगर, मेन रोड तळवडे येथे घडला.
फिर्यादी राजेंद्रसिंह हरीसिंह राठौड (वय ३७ वर्ष धंदा- व्यापार, रुपीनगर तळवडे) यांनी आरोपी अनोळखी ५ इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ४२८/२०२३, भा.द.वि.क. ३०७,३३७, ४२७, ३४, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५, क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चेकलम ३ व ७ प्रमाणे सह मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करीत चौघा जणांना अटक केली आहे.