न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- वाराणसी महानगरपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिपू गिरी, जयदेव चंद्रशेखर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच महापालिकेच्या कामाबद्द्ल समाधान व्यक्त केले.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उद्यान विभागाचे प्रमुख रविकिरण घोडके आदी उपस्थित होते.
या प्रसंगी संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणा-या आरोग्य सेवा, स्वच्छता, ई- क्लास रूम प्रकल्प, पाणी पुरवठा, स्वच्छ सर्वेक्षण, रस्ते विकास, कर आकरणी, उद्यान, पर्यावरण विभागामार्फत सूरू असलेल्या उपाययोजना तसेच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांविषयी माहिती व चर्चा करण्यात आली.
सिपू गिरी यांनी मनपा भवनाची पाहणी करून विभागानुसार माहिती जाणून घेतली. तसेच, स्मार्ट सिटी कार्यालय येथे विविध सेवांच्या डिजिटलायझेशनबाबत महापालिका व स्मार्ट सिटी उपक्रमांचे सादरीकरण, तसेच निगडीतील इंटीग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर येथे भेट देऊन कचरा संकलन, पाणी पुरवठा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतुक व्यवस्था याबाबत प्रत्यक्ष कार्यपध्दतीची माहिती घेतली. तसेच, अटल बिहारी वाजपेयी उद्यानात भेट दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी मार्फत लोकाभिमुख प्रकल्प राबविले जात असून ते नक्कीच शहराच्या विकासात लाभदायी ठरतील, अशाच प्रकारचे प्रकल्प वाराणसी महानगरात राबविण्यावर भर देणार असून डिजीटल भारताच्या विकासाला यातून चालना मिळणार असल्याचे मत गिरी यांनी व्यक्त केले.














