न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील अंध, अपंग, मूकबधीर दिव्यांग नागरिकांसाठी ‘मी कार्ड’ ही संकल्पना राबविण्यात येते.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) च्या वतीने शहरातील दिव्यांगाना ‘मी कार्ड’ या मोफत पासचे वितरण केले जाते. आर्थिक वर्ष संपले की, या पासची मुदतही संपत असते. काल रविवार (दि. ३१) रोजी या ‘मी कार्ड’ची मुदत संपली आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना ‘मी कार्ड’चे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेने सोमवार (दि १) रोजी पिंपरीतील लोखंडे भवन येथे पास वितरीत करण्यासाठी सोय केली होती.
मात्र, नूतनीकरणासाठी आलेल्या दिव्यांग नागरिकांची गर्दी आटोक्यात आणण्यात महापालिका यंत्रणा कुचकामी ठरली. भर उन्हात दिव्यांग नागरिकांना तिष्ठत राहवे लागले. त्यामुळे अधिकारी व त्यांच्यात खटके उडाले. काही नागरिकांना पास घेण्यासाठी जाताना देखील अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे अंध व अपंग व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागला.











