- पिंपरी विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्या प्रयत्नांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नाट्यगृहांची भाडेवाढ कमी करावी. याकरिता पिंपरी विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी प्रशासनाकडे वारंवार अर्ज-विनंत्या केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून नाट्यगृहांची भाडेवाढ रोखली नव्हती. याबाबत आज मंगळवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी आणि महापालिका सभेत नाट्यगृह भाढेवाढ शुल्कात ५० टक्के दर सवलत जाहीर केली आहे. तसेच ऑनलाइन बुकिंग देखील पुढील दोन महिन्यांपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोरखे यांनी म्हटले आहे की, ” काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हद्दीतील नाट्यगृहांच्या बाबतीत भाडेवाढसंबंधी निर्णय घेतला होता. ज्यामध्ये नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली होती. तसेच ऑनलाइन बुकिंगबाबत विचार विनिमय न करता निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांना पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कलाकार व नाट्यप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला होता. शहरातील अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांनी एकत्रित येऊन याविरोधात वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यावेळी मीही भाडेवाढीचा कडाडून विरोध केला होता, असेही पत्रकात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहर ही कामगार नगरी असून त्याचबरोबर ती सांस्कृतिकनगरी म्हणून नव्याने उदयास येत आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर नागरिकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी लक्षात घेऊन या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशा प्रकारचा पत्रव्यवहार महापालिका आयुक्त त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मी वारंवार केला होता. याबाबत आज महापालिका आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेलता आहे. भाढेवाढ पन्नास टक्के कमी केली असून, ऑनलाइन बुकिंगही पुढील दोन महिन्यासाठी स्थगित ठेवण्यात आले आहे. भाडेवाढीला स्थगिती देण्याबाबत पालकमंत्र्यांशी बैठकीत चर्चा करून त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन, अशी ग्वाही महापालिका आयुक्तांनी दिली आहे. आजच्या निर्णयामुळे पन्नास टक्केच यश मिळाले आहे. अजूनही भाडेवाढ कमी व्हावी व ऑनलाईन बुकिंग पूर्णतः बंद व्हावे, यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे, असे अमित गोरखे यांनी पत्रकात म्हटले आहे.


















