- ही कृती तात्काळ करा अन्यथा कलम १८८ प्रमाणे होईल गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- पुणे शहरात दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. दहशतवादी हे राजस्थान बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी होते. त्या अनुषंगाने पिंपरी पोलिसांनी नागरिकांना भाडेकरूचे रेंट अग्रीमेंट आणि दिलेल्या फॉरमॅटमधील माहिती तात्काळ पिंपरी पोलीस ठाण्यात सादर करण्याबाबत पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या सर्व सोसायटी, हॉस्टेल, रूम्स, पीजी रूम्स येथे राहणाऱ्या भाडेकरू यांनी भाडेकरूचे रेंट अग्रीमेंट आणि दिलेल्या फॉरमॅट मधील माहिती तात्काळ पिंपरी पोलीस स्टेशन येथे सादर करावी. भाडेकरुंची माहिती वेळेत सादर न केल्यास घर मालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल.
सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांनी पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूस सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये. अनधिकृत भाडेकरूस घरात प्रवेश दिल्यास/राहण्यास जागा दिल्यास/घरमालक/जागा मालक/ सोसायटी/अपार्टमेंट यांचे मालक/चालक यांच्यावर प्रचलित कायाद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाईन भाडेकरूचे व्हेरिफिकेशन केल्यास एक कॉपी पोलीस स्टेशन येथे आणून देणे बंधनकारक आहे. भाडेकरू सोबत घरात राहणाऱ्या सर्व व्यक्तींचीही माहिती भरून देणे बंधनकारक आहे. भाडेकरू व्यतिरिक्त असणारा माणूस देखिल संशयित असू शकतो, त्यामुळे सदरचा फॉर्म फॉरमॅट संपूर्ण भरून पोलीस स्टेशन येथे त्वरित/तात्काळ सादर करावा.
महाराष्ट्र रेंट अक्ट १९९९ अन्वये हेवी डिपॉझिट घेणे हे कायदेशीर नाही. झोपडपट्टी भागातील भाडेकरुंचीही माहिती घरमालकाने भरून देणे बंधनकारक आहे.
सर्व इस्टेट एजन्ट यांनी देखील आपण ठेवलेल्या भाडेकरूनची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन येथे सादर करायची आहे. इस्टेट एजन्ट यांनी इस्टेट एजन्ट असल्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. इस्टेट एजन्ट यांनी देखील आपला दिलेल्या माहितीचा फॉर्म भरून पोलीस स्टेशनला सादर करायची आहे. पोलीस स्टेशन येथे रजिस्टर्ड नसलेले अनधिकृत इस्टेट एजन्ट आढळून आल्यास त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. सर्व सोसायटीचे पदाधिकारी यांनी तात्काळ सोसायटीचे सुरक्षेकारिता cctv बसवून घेऊन स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित करावे.
काही व्यक्तींच्या संशयित/देशविरोधी हालचाली वाटल्यास त्वरित १०० आणि ११२ पिंपरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. माहिती लपवणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून तात्काळ सर्व भाडेकरु आणि भाडेकरुंचे कुटुंबातील सदस्यांची/नोकरांची/कामगार/सिक्युरिटी यांचे माहितीचे फॉर्म भरून पिंपरी पोलीस स्टेशन येथे सादर करावा, असे आवाहन पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी पोलीस स्टेशनचे दत्तात्रय निकम 9527733100, शहाजी धायगुडे 7977686878, पो.स्टे. 020 27472218 यांच्याशी संपर्क करावा, असे या पत्रकात म्हटले आहे.















