न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- पूर्वी पिंपरी चिंचवड शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असत. तसेच कचरा वेळेत न उचलल्यामुळे शहरात रोगराई व आदी प्रसंगांना शरवासियांना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेत शहरातील कचरा गोळा करून तो मोशी परिसरातील कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्यासाठी बीव्हीजी व ए.जी. एन्व्हायरो या कंपनीस निविदा प्रक्रिया राबवून कामांचा ठेका देण्यात आला होता. त्यात उत्तर भागाचे शहरातील कचरा गोळा करण्याचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदारांना दिले होते.
महापालिकेने त्यांना २८ फेब्रुवारी रोजी कामाची वर्क ऑर्डर दिली. परंतु, विहित मुदतीत काम सुरु झाले नाही. ए.जी. एन्व्हायरो इन्फ्रा या कंपनीने कामासाठी एक महिना मुदतवाढ मागितली तर व बीव्हीजी कपंनीने एप्रिलपासून काम सुरू करणार असल्याचे महापालिकेस कळविले. बीव्हीजी कंपनीने ठरल्याप्रमाणे १ एप्रिलपासून काम सुरु करणार असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. अनिल रॉय यांना सांगितले व रॉय यांनी मनपा आयुक्त हर्डीकर यांना त्याप्रमाणे सूचना केल्या.
संबंधित विषय स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांना कळताच रॉय यांच्यावर चांगलेच संतापले. रॉय व मडिगेरी यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली व वाद विकोपाला गेला. यावेळी मडिगेरी यांनी रॉय याना चांगलेच फ़ैलावर घेतले व आम्ही सत्ताधारी आहोत. ठरल्याप्रमाणे कामाची सुरुवात मे महिन्यापासून करण्याचे नियोजित असताना, तुम्ही बीव्हीजी कंपनीला काम सुरू करण्याची परवानगी दिलीच कशी? असे सुनावले. यावर रॉय यांनी मी आयुक्तांच्या कक्षेखाली काम करीत असून, याची माहिती त्यांना असून, त्यांच्या आदेशानेच कामास परवानगी दिली आहे, असे रॉय यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना सभापती विलास मडिगेरी म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराचे विभाजन करुन दोन भागात कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदारांना दिले आहे. दोन्ही कंत्राटदारांना १ मे रोजी काम सुरु करण्यास मान्यता द्यावी, असा आदेश देण्यात आला होता. तथापि, बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या कंत्राटदाराला आज काम सुरु करण्यास मान्यता दिली. कामाला मान्यता देताना आम्हाला विचारणे आवश्यक आहे. आम्ही सत्ताधारी आहोत. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांची आयुक्तांकडे तक्रार केली आहे”










