न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी दापोडी येथील चर्चला शनिवारी भेट दिली. यावेळी तेथील फादर यांची भेट घेऊन नमस्कार करणे स्वाभाविक होते. तसाच पवार यांनी एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे एक आदरयुक्त भावना म्हणून नमस्कार केला होता. परंतु, विरोधकांनी त्या नमस्काराचा चमत्कार करुन वादग्रस्त पोस्ट बनवून निवडणुकीत पार्थ पवार यांच्यावरती चिखलफेक करण्यासाठी वापर केला आहे.
शनिवारी दापोडी येथील विनियार्ड चर्च मध्ये फादर फास्टर डेविड सिल्वे व जयश्री रेल्वे यांची पार्थ पवार यांनी भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना नमस्कार केला. ख्रिश्चन समाजाचे प्रार्थना स्थळ चर्चमध्ये आल्यानंतर फादर प्रत्येकास आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या परंपरेनुसार डोक्यावर हात ठेवतात. परंतु, मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या नमस्काराचा फोटोचा वापर करून विरोधकांनी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्म पोरींची भेट घेतल्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवुन टिकेची झोड उठवली.
वस्तुस्थिती पाहता एखाद्या मंदिर, मस्जिद मध्ये किंवा चर्चमध्ये स्वामी, फकीर किंवा धर्मगुरू असतात. याठिकाणी जाणारा सामान्य व्यक्ती नमस्कार करतो आशिर्वाद घेतो. परंतु मावळचे युवा उमेदवार पार्थ पवार यांना विरोधकांकडुन जाणीवपुर्वक ट्रोल केले जात आहे. विरोधकांनी यापुर्वी स्थानिक व बाहेरचा वाद तयार करुन बाहेरील मतदारांची नाराजी ओढवुन घेतली होती. आता समाजातील अल्पसंख्यांक मतदारांची नाराजी पुन्हा एकदा घेतल्याने यांची किमंत निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला चुकवावी लागेल, असे मत नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मंदिरांमध्ये जाऊन त्या त्या ठिकाणच्या स्वामींचे, गुरूंचे आशीर्वाद घेताना फोटो व्हायरल केले जातात. मात्र विरोधकांनी कधी त्या गुरुची धर्म, जात, गुन्हेगारी प्रवृत्ती याचे राजकीय भांडवल केलं नाही. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील मावळ लोकसभा शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराकडून खोडसाळपणा जाणीपूर्वक केल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्व जातीधर्मातील लोकांच्या युतीच्या उमेदवाराविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.










