- खासगी रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना धरले जातेय वेठीस..
- आयुक्तांनी चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी..
- जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिका वायसीएम रुग्णालयासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात मोठी तरदूत करीत असते. शहरातील नागरिकांना उच्च कोटीची आरोग्य सुविधा मिळावी हा त्या मागचा खरा उद्देश आहे. मात्र, होतेय उलटेच. वायसीएम रुग्णालयातील बाह्य आणि आंतर रुग्ण विभागात भलताच सावळा गोंधळ सुरु आहे. डॉक्टर रुग्णांच ऐकत नाही, पॅरामेडिकल स्टाफ व नर्सवर कोणाचेच नियंत्रण नाही. गरज नसताना रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविण्याच्या घटना सर्रास होत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयातील गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी आयुक्तांकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात मजीद शेख यांनी म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची नेहमीच अडवणूक केली जात आहे. उपचारासाठी आलेल्या गोरगरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णाचा रोग भयंकर आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयात भर्ती होण्याचा सल्ला दिला जातो. न ऐकणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता तसेच ताटकळत ठेवून त्यांना मरणाच्या खाईत लोटण्याचा प्रकारही सर्रास घडत आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये रूग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापाची भावना निर्माण होत आहे.
शहरातील लाखो करदात्यांच्या पैशातूनच हे रुग्णालय महापालिका चालवते. खासगी रूग्णालयातच रुग्णांना उपचार घ्यायची वेळ येत असेल तर, शहरातील करदात्यांनी महापालिकेला कर का द्यायचा?, असा सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे. दरम्यान रुग्णालयामध्ये वरिष्ठांचा आदेश कर्मचारी मानत नाही. सगळ्यांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले आहेत. औषधांचा नेहमीच तुटवडा भासतो. चुकीची नियमावली लागू करून औषधासाठी दिशाभूल करण्याचा प्रकारही नेहमीच होत आहे. रुग्णाला आयसीयुची गरज आहे त्यासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, असे कारण देत उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमावी. संबंधितांवर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे या पत्रकात मजीद शेख यांनी म्हटले आहे.











