न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. या टवाळखोरांना आवर घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलिसांना दिले. त्यानुसार, सोमवारी (दि. ३१) गुन्हे शाखेने २७ जणांवर कारवाई करीत टवाळखोरांना चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आल्याचे कळताच टवाळखोरांची पळापळ झाली.
मागील काही दिवसांपासून शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींना टवाळखोरांचा लागला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या होत्या. काही विनयभंगाचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे काही तक्रारी गेल्या होत्या. आयुक्तांनी वाहतूक आणि गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुंडा विरोधी पथक आणि युनिट एकच्या पथकाने भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, ताथवडे येथील बालाजी लॉ कॉलेज, काळेवाडीतील एमएम कॉलेज, निर्मल बेथनी कॉलेज, डुडुळगाव येथील राजमाता जिजाऊ कॉलेज, चिंचवड येथील फत्तेचंद जैन कॉलेज या ठिकाणी घुटमळणाऱ्या २७ टवाळांवर कारवाई करीत त्यांना अद्दल घडवली.
पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या तक्रार पेट्यांचा वापर होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रारपेटी ठेवण्याची सूचना केली.
महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालयाबाहेर विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना समज देण्यात आली. तर तरुणींना त्रास देणाऱ्या २७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढेही कारवाई सुरू राहणार आहे.
हरीश माने, सहायक पोलीस निरीक्षक, गुंडा विरोधी पथक…











