- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा; पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे रविवारी सहकार क्षेत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शंभरपेक्षा जास्त जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील ‘डिटेन्ड’ करण्यात आले होते.
अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त काही राजकीय पक्षांकडून तसेच काही संघटना व व्यक्तींकडून आंदोलन तसेच निषेध व्यक्त करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरातील काही पोलिस ठाण्यांकडून नोटीस देखील बजावण्यात आल्या होत्या. मंत्र्यांचा ताफा मार्गस्थ होणार असलेल्या मार्गावरील रस्त्याच्या कडेला, पदपथावर तसेच अनधिकृत पार्क केलेल्या हजारो वाहनांना हलविण्यात आले. तसेच पथारीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले यांना देखील या मार्गावर मनाई करण्यात आली होती.
अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या घरी सकाळपासून पोलिस दाखल झाले होते. तसेच इतर काही जणांकडेही पोलिस गेले होते. ताफा मार्गस्थ झाल्यानंतर त्यांना सोडले. अनेकांना पोलिस ठाण्यांमध्ये आणले होते. अमित शाह यांचा कार्यक्रम होऊन त्यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी पोलिस ठाण्यातून त्यांना सोडण्यात आले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड ४१, चिंचवड २२, निगडी ११, चिखली ५, भोसरी २, पिंपरी १, सांगवी २ या पोलीस पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.