- पिंपरी पोलिसांकडून दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- पुर्वीच्या भांडणाच्या कारणातून फिर्यादी यांनी आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्याचा राग मनात धरुन आरोपी फिर्यादीच्या घरामध्ये लोखंडी कोयते घेवुन जबरदस्तीने घुसले. फिर्यादी व त्यांच्या मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या मुलीचा मोबाईल फोडुन नुकसान केले. तसेच टेबलवर ठेवलेली पर्स व पर्समधील तेराशे रुपये रोख रक्कम, आधार कार्ड व १२५० रुपये किंमतीच्या चांदीच्या दोन रिंग असे जबरदस्तीने कोयत्याचा धाक दाखवून घेवून गेले. जाताना फिर्यादीच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारुन तोडफोड करीत नुकसान केले व रोडवर पार्क केलेल्या गाडयांवर कोयत्याने मारुन गाडयांची तोडफोड करून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी पहाटे २.३० वा. फिर्यादीच्या रहात्या घरी गांधीनगर, पिंपरी येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी संतोष अशोक अलकुंटे, कृष्णा तिमप्पा निराळे, विधीसंघर्षित बालक रोहीत, आज्या गवांडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ८३१ / २०२३ भादवी कलम ३९५,५०४, ५०६ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) (२७), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३,७ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. पोउपनि कोकाटे पुढील तपास करीत आहेत.