न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करावी, याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पालिकेच्या हद्दीतील भोसरी व इतर अनेक गावांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सतत होत असतो. भोसरीतील दिघी रोड येथील सिद्धेश्वर शाळेजवळ अशीच मोकाट व पिसाळलेली कुत्री गेले काही दिवस शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना चावत आहेत. तेथील काही नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे. तसेच भोसरीतील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हे बाधित नागरिक गेले असता तेथे व वायसीएममध्येही रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले.
ऱॅबीपूर ही रेबीजवरील लस मेडिकल दुकानांत ३३६ रु. ना असून ती देण्यासाठी डॉक्टरांची तपासणी व इतर फी इ. धरुन प्रती इंजेक्शन सुमारे ५०० रु. खर्च नागरिकांना करावा लागत आहे. म्हणजेच ४ इंजेक्शन सुमारे दोन हजार रु. नागरिकांना खर्च करावे लागत आहेत. मग नागरिक कर कशासाठी भरतात?
मोकाट कुत्री पकडण्यासाठी पुर्वीही सारथीवर तक्रारी दिल्या होत्या. त्यावर सतत कार्यवाही का होत नाही. आज पुन्हा तक्रार दिली आहे (Thank you for Logging your Grievance with PCMC. Your Token Number is W40095) अशा प्रकारचा मेसेज येतो. परंतु, समस्येची दखल जात नाही. अशी मोकाट व पिसाळलेली कुत्री पकडून त्यांना पुन्हा न सोडता योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात यावी व इतर कुत्र्यांची नसबंदी नियमित करण्यात यावी. इतर मोकाट जनावरेही नियमित पकडण्यात यावीत.
महापालिकेकडून शेवटची जीवनावश्यक औषधे (Life Saving Drugs) केंव्हा खरेदी करण्यात आली होती? त्यानंतर खरेदी वेळेवर का झाली नाही? टेंडर प्रक्रिया शेवटची कधी राबविण्यात आली होती? महापालिकेतील विविध हॉस्पिटल्सची औषधांची मागणी दरमहा किती असते व आपल्याकडे तीन महिन्यांचा आपत्कालीन बफर स्टॉक असतो का?
नागरिक कोट्यवधींचा कर दरवर्षी भरत असताना खासगी हॉस्पिटलमध्ये जाउन अश्या बेसिक सुविधांवर हजारो रु. खर्च करावे लागत असतील, तर हा भ्रष्ट कारभाराचाच नमुना आहे. शिक्षण व आरोग्य सुविधा सर्व नागरिकांना मोफत व दर्जेदार पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पालिकेच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये रेबीज प्रतिबंधक तसेच इतर सर्व जीवनावश्यक औषधे तीन महिने पुरतील इतका बफर स्टॉक ठेवावा, असेही गोडांबे यांनी या पत्रात म्हटले आहे.










