- राष्ट्रवादीच्या अतिश बारणेंसह शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट..
- उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना घेतले फैलावर; एकतर्फी निर्णय न घेण्याचा दिला सल्ला..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशिमध्ये कचरा डेपो आहे. तसेच रिव्हर रेसिडेन्सी येथील रद्द करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प त्याच्याच खाली २०० मीटर वर सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातच आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन कचरा स्थानांतर केंद्र करण्यात येणार आहेत. जुना प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ यापैकी बोऱ्हाडेवाडी येथेच एक कचरा स्थानांतर केंद्र उद्यानाची जागा आरक्षित असताना त्याच जागेवर हे केंद्र उभा करण्यात येत असल्याने नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे व महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत ‘माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही’, असे समजू नका; असा सज्जड दम देत कोणतेही काम विचार विनिमयानी करा असे आदेश दिले आहेत.
यावेळी अश्विनी सस्ते, जीवन सस्ते काशिनाथ धरी, उमेश उगीले, विनोद शिर्के, प्रभाकर गुरव, चंद्रकांत बिरादार,विठ्ठल अहिरे, अप्पासाहेब कोळी, बंडू मजगे, वैभव थोरात, प्रवीण सूर्यवंशी, अरुण जाधव, प्रकाश पवार, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंगसाठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंगसाठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का? असा सवालही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक्त सिंह यांना केला आहे.
” आपण काही निर्णय एकतर्फी घेत आहात. यापुढे असे चालणार नाही. नागरिकांच्या दृष्टीने व त्यांचा विचार करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. यापुढे कोणतेही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत, मी महापालिकेमध्ये मीटिंग घेणार आहे. त्यावेळी नागरिकांच्या, शहरवासीयांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. फक्त कोणी तरी सांगत आहे म्हणून जर आपण काही निर्णय घेत असाल तर ते थांबवा. माझे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रश्न मांडले तर त्यावर ही विचार करा, तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहीत आहे, कोणते ही निर्णय यापुढे एकतर्फी झाले नाही पाहिजेत ”, असा सज्जड दम अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिला.
अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…
महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे बहुतांशी भाजपाच्या आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची चलती आहे. परंतु राज्यातील राजकारणात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे गट एकत्रित आल्यामुळे महापालिकेतीलही राजकारण बदलले आहे. भाजपा बरोबरच अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यापुढे कोणतेही निर्णय नागरिकांच्या विरोधात कोण तरी सांगत आहे म्हणून घेऊ नका, असे खुद्द आयुक्तांना आदेश दिले असल्याने अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

















