- विशिष्ट पथकाद्वारे कठोर कारवाईचा वाहतूक पोलिसांकडून इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) पिंपरी-चिंचवड हद्दीतील बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या ५७ हजार खासगी वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी दंडाचा दणका दिला आहे. गेल्या आठ महिन्यांतील ही कारवाई असून ऑगस्टमध्ये सर्वाधिक १० हजार खासगी वाहनांवर कारवाई केल्याचे स्पष्ट होते.
नागरिकांना जलद वाहतूक सेवा देता यावी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत पीएमपीचे सात बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू केले आहेत. पिंपरी-चिंचवड हद्दीत चार आणि पुणे हद्दीत तीन आहेत. यातून दिवसाला ७५० ते ८०० बस धावतात. दिवसाला ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. पण, बीआरटी मार्गात बऱ्याच वेळा खासगी वाहनांची घुसखोरी होते. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा निर्माण होतो. बऱ्याचदा अपघात होतात. यात काहींचा जीव गेला आहे.
बीआरटी मार्गातील घुसखोरी रोखण्यासाठी वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने १ जानेवारी ते २६ ऑगस्ट दरम्यान अशा ५७ हजार ७५२ वाहनचालकांवर दंड ठोठावला आहे. तरीही खासगी वाहनांची घुसखोरी सुरूच आहे.
बीआरटी मार्गात पीएमपीने सुरुवातीला काही खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. नंतर लाखो रुपये खर्च करून प्रायोगिक तत्त्वावर १० ते १२ ठिकाणी बूम बॅरिअर बसवले होते. पण, खासगी वाहनांकडून बूम बॅरिअरचे नुकसान होत असल्याने ते काढून टाकले.
पोलिसांकडून दिघी, आळंदी, निगडी. चिचवड, भोसरीतील बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या ५७ हजार खासगी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. अजून घुसखोरी सुरुच असल्यामुळे येथून पुढे विशिष्ट पथकाद्वारे कठोर कारवाई केली जाणार आहे.
– विठ्ठल कुबडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड…












