- आणखी नियमबाह्य ३५७ होर्डिंग वेटिंगवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील नियमबाह्य असलेल्या एकूण ३५७ होर्डिंगचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास ते होर्डिंग तोडून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिला आहे.
परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होडिंग असणे, एका बाजूची परवानगी घेऊन दोन्ही बाजूने होर्डिंग लावणे, होर्डिंगवर आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिलेला परवाना क्रमांकाचा छोटा फलक न लावणे या कारणांसाठी या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या तसेच, अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. या पुढे शहरात एकही अनधिकृत जाहिरात होर्डिंग ठेवण्यात येणार नाही, असे उपायुक्त इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात २० एप्रिल ते आतापर्यंत तब्बल १६८ अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आले आहेत. त्यातील ९५ होर्डिंग मालक व चालकांनी काढून घेतले आहेत. तर, एकूण ७३ होर्डिंग महापालिकेने तोडून जप्त केले आहे. त्यातून मिळालेल्या भंगारातून पालिकेस २ कोटी ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
न्यायालयात गेलेल्या अनधिकृत २८१ होर्डिगपैकी २६३ होर्डिंगचे एकूण ४ कोटी १९ लाख ५० हजार ८१६ रुपये परवाना शुल्क महापालिकेकडे जमा करण्यात आले आहेत. न्यायालयात गेलेल्या होडिंगचालकांकडून पाचपट शुल्क घेऊन त्याच्या होर्डिंगला रितसर परवाना दिला जाणार आहे. पाचपट शुल्क न भरणारे होर्डिंग तोडून जप्त करण्यात येणार आहेत, असे उपायुक्त इंगळे यांनी सांगितले.
लोकवस्ती, वर्दळीच्या ठिकाणी तसेच, अनधिकृत बांधकामांवर असलेल्या जाहिरात होर्डिंगमुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका आहे. अशा प्रकाराची धोकादायक जाहिरात होर्डिग तोडण्यात येणार आहेत. तसेच, ज्या इमारतीवर होर्डिंग लावले आहे त्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच, त्या इमारत किंवा संबंधित हाऊसिंग सोसायटीकडूनही अतिरिक्त परवाना शुल्क वसुल केला जाणार आहे, असे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.












