न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील चार पदांचा निकाल बुधवारी (दि. ३०) रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील जागांसाठी टाटा कन्सलटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून दि. २६, २७ व २८ मे रोजी परीक्षा झाली. त्यावेळी ५५ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महापालिकेने ११ पदांच्या ३५ जागांसाठी ७ ऑगस्टला निकाल जाहीर केला होता.
मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांचा निकाल रखडला होता. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा होऊनही निकाल लावण्यास विलंब का होत आहे, असा सवाल परीक्षार्थी उपस्थित करत होते.
११ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार पदांचा निकाल स्वातंत्र्य दिनापूर्वी लावण्याचा मुहूर्त प्रशासनाने दिला होता. मात्र, हाही मुहूर्त हुकल्याने परीक्षार्थीकडून महापालिका आणि परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीवर मोठी नाराजी व्यक्त केली जात होती.












