- चौकात उडाला एकच गोंधळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- तळेगाव दाभाडे येथे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव स्टेशन चौकातील वाहतूक विभाग पोलिस चौकीवर चढून एका मनोरुग्णाने वाहनांवर केलेल्या दगडफेकीमुळे चौकात एकच गोंधळ उडाला होता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, सहायक पोलिस निरीक्षक दुर्गानाथ साळी, वन्यजीव रक्षक ८ संस्थेचे निलेश गराडे, भास्कर माळी, अग्निशमन दलाचे बाळू ठाकर, शेखर खोमणे, धीरज शिंदे, गणेश जावळेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी भास्कर माळी व गणेश पाटील यांनी वरती चढून मनोरुग्णाला खाली घेण्याचा प्रयत्न केला असता ”मी रेल्वे रुळावर उडी मारेल” असा आरडाओरडा त्याने केला.
अग्निशमन दलाने जुना पूल व नवीन पुलावर जाळी टाकत पाण्याचा फवारा मारत मनोरुग्णाला खाली उतरण्यास भाग पाडले. या मनोरुग्णाच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्याला नातेवाइकांच्या ताब्यात दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवी अशोक मुंडे (वय ३२, रा वासीम, बीड) असे मनोरुणाचे नाव आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १) सकाळच्या सुमारास रवी मुंडे हा मनोरुग्ण तळेगाव स्टेशन भागातील रेल्वे पुलाजवळ असणाऱ्या वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीवर लोखंडी रॉड घेऊन चढला होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दगड आणि वीट फेकून मारत असल्यामुळे स्टेशन चौकामध्ये एकच गोंधळ उडाला होता. यामुळे तळेगाव-चाकण महामार्गावरील नेहमीच्या वाहतूककोंडीत आणखी भर पडून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


















