- २२ सप्टेंबरनंतर होणार पायउतार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) दणका दिला आहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती दि. २२ सप्टेंबरपर्यंतच असणार आहे. दि. २२ सप्टेंबरनंतर त्यांची नियुक्ती संपुष्टात येईल. नगरविकास विभागाने नियुक्तीचा आढावा घ्यावा. पात्रता, निकष तपासवेत, असे आदेशही मॅटने दिले आहेत.
महापालिकेत असलेल्या स्मिता झगडे यांची दि. १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करून घेतले नाही. त्यानंतर राज्य शासनाने दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करून प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते.
झगडे यांनी उपायुक्त राज्य सरकार, प्रदीप जांभळे आणि महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी केले होते. महाराष्ट्र प्रशासकीय लवादचे (मॅट) सदस्य ए. पी. कुन्हेकर यांच्या खंडपीठाने प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द केली होती. त्याविरोधात त्यांनी अपील केले होते. जांभळे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा मॅटकडे पाठविले होते. सदस्य मृदुला भटकर आणि देबाशिष चक्रवर्ती यांच्या खंडपीठापुढे त्याबाबत सुनावण्या झाल्या.













