- ”तुझ्यात जीव रंगला फेम” सिने अभिनेते राणादा व सिने अभिनेत्री अंजलीबाई यांची प्रमुख उपस्थिती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बारामती (दि. ७ एप्रिल) :- दुष्काळाच्या समस्येला निसर्ग नाही, तर मनुष्याचा निष्काळजीपणाच जबाबदार आहे. पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण हा या समस्येवरचा शास्त्रशुद्ध उपाय होता, पण या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होता, तो म्हणजे समाज-मनातली दरी. ”पानी फाउंडेशन” ही एकजूटीवर १००% विश्वास ठेवणारी संस्था आहे आणि दुष्काळाची समस्या सोडवायची असेल, तर लोकांनीच एकत्र येऊन ही चळवळ हाती घेतली पाहिजे.
याच भूमिकेतून बारामती पाणी फाउंडेशन व जराडवाडी पाणी फाउंडेशन समुह आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान जपत आहे. या माध्यमातूनच एक अत्यंत परिपूर्ण आणि अनुभव संपन्न असा पाणी फाउंडेशनचा उपक्रम ते राबवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात येवून, त्यांना दुष्काळाला तोंड देताना, आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींबरोबरच नेतृत्त्व-कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धा २०१९ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट पाणलोट व्यवस्थापनाचे बक्षीस मिळवण्यासाठी गावा-गावांमध्ये चुरस लागते. आज रविवार (दि. ७) रोजी रात्री ८.०० वाजता ”श्रमदान शुभारंभा” चे सिने अभिनेते ”तुझ्यात जीव रंगला फेम” राणादा (हार्दिक जोशी) व अंजलीबाई (अक्षया देवधर) यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास जराडवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जराडवाडी पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.










