न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- देहूतील कुंभारवाडा परिसरात उदमांजरांचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, येथील वन्यजीव रक्षक व प्राणी मित्र गणेश ठोंबरे यांनी एका उदमांजराला पकडून त्याची सुटका केली. तरी या भागात उदमांजरांचा वावर दिसून आल्याने वनविभागाने याबाबत तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती प्राणी मित्र गणेश ठोंबरे व विशाल परदेशी यांनी केली आहे.
देहू नगरपंचायतीच्या नगरसेविकेच्या घराचे रंगकाम सुरू असताना फर्निचरच्या मागे एक लहान उदमांजर अडकलेले दिसून आले होते. मात्र, हे उदमांजर केव्हा घरात आले याबाबत कोणालाही माहिती नसल्याने ते सर्व जण घाबरले. त्यांनी अडकलेल्या या वेगळ्या प्राण्याबद्दल तातडीने येथील प्राणी मित्र व अॅनिमल रेस्कू टीम ऑफ देहूचे संस्थापक गणेश ठोंबरे यांना कल्पना दिली. त्यांनी हा प्राणी पाहिल्यावर उदमांजर असल्याचे सांगितले. त्यांची रेस्कू टीम तातडीने दाखल झाली व त्या उदमांजराला बाहेर काढून जीवदान दिले. उदमांजरांच्या उपद्रवामुळे येथील रहिवाशी घाबरले आहेत.
या परिसरात सात ते आठ लहान व तीन ते चार प्रौढ उदमांजरे आढळली आहेत. त्यांचा बंदोबस्त करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. कुंभारवाडा परिसरात आठ मांजरांचा वावर आहे, अशी माहिती ठोंबरे यांनी दिली.















