- पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष निवडण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी..
- मच्छिंद्र तापकीर, संदीप काटे, तुषार कामठे आणि इतरांच्या झाल्या मुलाखती?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाला शह देण्यासाठी राष्ट्रवादीचा शरद पवार गट सक्रिय झालेला आहे. शहराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.
शुक्रवारी शहराध्यक्ष पदासाठी शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप काटे, माजी नगरसेवक तुषार कामठे, संदीप चव्हाण, काशिनाथ जगताप यांनी मुलाखती देल्याची माहिती मिळतेय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात शरद पवार गट देखील सक्रीय होऊन कोणत्या दमदार उमेदवाराची निवड करून महायुतीला टक्कर देईल? असा सवाल उपस्थित होतोय.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. काही आमदार घेऊन अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. तर, काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचं आजही बघायला मिळतं. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार की अजित पवार असा संभ्रम निर्माण झालेला आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील आजी- माजी नगरसेवकांनी अजित पवारांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. तर पक्ष संघटनेतील बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली. एका बाजूला अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्षांची नव्याने निवड केली. दुसरीकडे जयंत पाटील यांनी पिंपरी- चिंचवड शहरात कार्यकारी समिती जाहीर केली. सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर यांच्यावर शहरात कार्य पुढे सुरु ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. आता शहराध्यक्ष पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शरद पवार गट काय नवीन करिश्मा दाखवतो? यावरच सर्व चित्र अवलंबून आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.















