- दुर्घटनेला जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर कडक कारवाई करा..
- अन्यथा महावितरण कार्यालयात टाळ कुटो आंदोलन; संदीप काटे यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २० सप्टेंबर २०२३) :- स्मार्ट सिटी पिंपळे सौदागर येथील बीआरटीएस मार्गालगत असणाऱ्या विश्वशांती कॉलनी गावठाण परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हकनाक तीन शेळ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर मेंढपाळाला शॉक बसून तो जखमी झाला आहे. भूमिगत केबलच्या उघड्या वायरला स्पर्श झाल्याने आज बुधवारी (दि. २०) रोजी ही घटना घडली. या दुर्घटनेला जबाबदार दोषी यंत्रणांवर आणि ठेकेदारावर महावितरणकडून कडक कारवाई व्हावी. तसेच सबंधित मेंढपाळाला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी. परिसरातील भूमिगत सदोष वीज वाहिन्यांमधील तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करावा. पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास महावितरण कार्यालयात टाळ कुटो आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे महावितरण प्रशासनाला दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बीआरटीएस मार्गालगत असणाऱ्या विश्वशांती कॉलनी गावठाण येथील रस्त्यावर भूमिगत उघड्या केबलचा चारा खाण्यासाठी आलेल्या शेळीला धक्का लागला. त्यामुळे ती बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळली. काय झाले हे पाहण्यासाठी आलेल्या मेंढपाळाला देखील केबलचा शॉक बसला. त्यामुळे तोही काही अंतरावर जाऊन खाली पडला. पुन्हा त्याच जागी कळपातील आणखी दोन शेळ्यांनाही विजेचा धक्का बसून त्याही जाग्यावरच गतप्राण झाल्या. दुर्घटनेत तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. मेंढपाळ मात्र सुदैवाने बचावला. उघड्या केबलबाबत चारच दिवसांपूर्वी महावितरणला कल्पना दिली होती. दुरुस्तीच्या सूचना कराव्यात, अशी विनंतीही महावितरणकडे केली होती. मात्र, वेळोवेळी माहिती देऊनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेळ्यांवर आज जीव गमावण्याची वेळ आली. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी महावितरणाने त्वरित परिसरातील भूमिगत केबलची दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने महावितरण कार्यालयात टाळ कुटो आंदोलन केले जाईल, असा इशारा काटे यांनी पत्रकात दिला आहे.
”गेल्या काही वर्षांपासून येथील केबलमध्ये वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. शिवाय या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिलांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या अर्धवट कामामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील महावितरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये महावितरणच्या कामाविषयी संताप निर्माण होत आहे.”
संदीप काटे (सामाजिक कार्यकर्ते)…

















