- त्यात आमचा काय दोष? – अॅड. कांता गोर्डे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२३) :- महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे यावर्षीचे वार्षिक अधिवेशन पुण्यात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन, पिंपरी चिंचवड, खेड, मावळ तालुका अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे यांनी केली आहे. या संदर्भात प्रदेश अध्यक्ष अॅड. सिकंदर सय्यद अली, अॅड. यशवंत खराडे, अॅड प्रवीण नलावडे यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, असे महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन, पिंपरी चिंचवड, खेड, मावळ तालुका सचिव नोटरी अॅड. कांता गोर्डे यांनी सांगितले.
एका दैनिकाच्या कार्यालायत गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नोटरी अॅड. कांता गोर्डे यांनी ही माहिती दिली. यावेळी महासचिव पूनम स्वामी प्रधान, अॅड. सुजाता बिडकर उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या की, नोटरीचे अधिवेशन पुण्यात झाल्यास पुणे विभागातील वकिलांना नोटरी व इत दस्तावेज करताना येणाऱ्या अडचणी किंवा दस्त, कलमांमध्ये झालेले बदल या अधिवेशनाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचतील. नोटरींना बऱ्याच अडचणी येतात. कायद्याने नोटरींची कामे ठरवून दिलेली आहे. मात्र, अनेकदा जाणूनबुजून पक्षकार चुकीचे कागदपत्र देतात. शासकीय दस्ताऐवजानंतर नोटरी केले जाते. मात्र, पक्षकाराच्या चुकीमुळे नोटरींवर गुन्हे दाखल होतात. त्यावेळी नोटरींना मानसिक तणावातून जावे लागते. त्यामुळे पोलीस स्टेशनला जावे लागते. शहरातील सर्व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. प्रॅक्टिसचा भाग म्हणून आम्ही नोटरी करून देतो. कायद्याच्या साच्यात बसवून दिलेले काम करतो. मात्र, पक्षकाराच्या चुकीमुळे आमच्यावर गुन्हे दाखल होतात. पोलिसांनी नोटरींवर गुन्हा दाखल करताना नोटीस द्याव्यात. नोटरी वकिलांना ओळखपत्र द्यावे, अशी सरकारकडे मागणी करणार आहे, असे अॅड. गोर्डे यांनी सांगितले.


















